नवीपेठेत बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील नवीपेठ भागात मध्यरात्री चोरट्यांनी बंद घराच्या लोखंडी खिडकीचे गज वाकवून सोन्याचांदीचे दागिने व रोकड असा एकूण 15 ते 20 लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीपेठ परिसरात पत्र्या हनुमान मंदिर समोर बॉम्बे लॉजच्या गल्लीत राजू गोविंद अग्रवाल (वय-५२) हे परिवारासह राहतात. मोबाईल रिपेअरिंग करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. २४ मार्च रोजी ते दुपारी पुणे येथे मुलगा अखिल अग्रवाल याच्याकडे गेले होते. तत्पूर्वी त्यांची बहीण सुरेखा नंदू भावसार या दुबई येथे मुलाकडे जाणार असल्याने त्यांनी सोन्याचे दागिने राजू अग्रवाल यांच्या घरी ठेवले होते.

राजू अग्रवाल यांच्या घराच्या शेजारीच रेल्वेची हद्द असून त्याठिकाणी रेल्वेचे एक जुने ऑफिस देखील आहे. चोरट्यांनी रेल्वेच्या बाजूने येत लोखंडी खिडकीचे गज वाकवून काचेची खिडकी फोडत घरात प्रवेश केला. कपाट फोडत चोरट्यांनी मंगळसूत्र, नेकलेस, मोतीहार, बारा कानातले, सोन्याचे तुकडे, २ अंगठी, ३ सोन्याचे शिक्के, चैन असा जवळपास २५ ते ३० तोळे दागिने आणि देव्हाऱ्यात ठेवलेले ८ हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला. हा प्रकार आज सकाळी कुटुंबीय घरी आल्यावर उघडकीला आला आहे.

पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक जगदीश मोरे, सर्जेराव क्षीरसागर, कर्मचारी योगेश बोरसे, योगेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे, प्रणेश ठाकूर, मोरे यांच्यासह एलसीबीचे विजयसिंग पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, अक्रम शेख, अविनाश देवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.

 

Protected Content