खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रोटरी क्लब खामगांव अंतर्गत रोटरी मानव सेवा संस्थेद्वारे संचालित रोटरी गतीमंद विद्यालयाने बुलढाणा जिल्हा समाजकल्याण विभागाद्वारे ११ जानेवारी २०२४ रोजी आयोजिलेल्या प्रत्यक्ष पाहणीनंतर केलेल्या मूल्यांकनात “अ” वर्ग संपादित केलेला आहे. विशेष म्हणजे मूल्यांकनाच्या सर्वच निकषांवर खरे उतरत विद्यालयाने पैकीच्या पैकी गुण मिळविलेले आहेत. रोटरी मानव सेवाचे अध्यक्ष डॉ. आनंद झुनझुनुवाला हे आहेत तर गतीमंद विद्यालयाचे अध्यक्ष श्री दीपक अग्रवाल (गाडोदिया) हे आहेत तर श्री राजीव नथाणी यांचा भरभक्कम आधार विद्यालयाला आहे. या शाळेची मुहूर्तमेढ जानेवारी २००४ साली म्हणजेच २० वर्षांआधी रोवण्यात आली. त्यावेळेस असलेली ५ ही विद्यार्थी संख्या सद्यस्थितीत ५८ पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यावेळेस “विनाअनुदानित” तत्वावर सुरु झालेले विद्यालय आजदेखील विनाअनुदान तत्त्वावरच सुरु आहे.
याठिकाणी कुठलीही फी आकारण्यात येत नाही. शाळेचा गणवेश सर्व विद्यार्थ्याना मोफत दिल्या जातो. दुरून येणा-या काही विद्यार्थ्याच्या ऑटोच्या खर्चाची ६० टक्के प्रतिपूर्ती रोटरी क्लबद्वारे केल्या जाते. प्राचार्या श्रीमती सरिता पाटील यांच्यासमवेत ५ प्रशिक्षित कर्मचा-यांचा ताफा सध्या येथे कार्यरत आहे. या सर्वांचा पगार आणि विद्यालयाचा इतर खर्च रोटरी मानव सेवाद्वारेच केल्या जातो. सदर विद्यालय हे पूर्वीच्या शिशु मंदिर या बालक मंदिराच्या जागेवर उभे आहे. शहरातील दानशूर व्यक्तिमत्व श्री अशोकजी झुनझुनुवाला यांनी विद्यादानाच्या या पवित्र कार्यासाठी सदर जागा उपलब्ध करून दिलेली आहे.
या ठिकाणी गतीमंद विद्यार्थ्यांना नियमित प्रशिक्षणासोबत रोजगाराचेदेखील धडे दिले जातात. विद्यार्थ्यांव्दारे बनविलेल्या वस्तूंची प्रदर्शनी आणि विक्री अनेक मंचांवर नियमितपणे आयोजित करण्यात येत असते. एव्हढेच नव्हे तर खामगांव शहरातील सुप्रसिद्ध संगीतज्ञ श्री दीपकजी बगाडे हे आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्याना सुगम संगीताचे धडे देत असतात. प्रत्येक राष्ट्रीय सणाला हे विद्यार्थी विद्यालयाच्या मंचावर त्यांच्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करीत असतात. तसेच जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यानी अनेकदा पदकांची लयलूट केलेली आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याची बाहेरगांवी कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळाला सहल आयोजित करण्यात येते, त्यावेळेस त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी असते.
रोटरी क्लब खामगांवचे अनेक सदस्य आपले व आपल्या परिवाराचे वाढदिवस किंवा विशेष दिवस या विद्यार्थ्यासोबत साजरे करतात. विद्यालयाला खामगांव शहर व परिसरातील अनेक दानशूर व्यक्ती वर्षभर देणगी देत असतात. तसेच ५१०० रुपये भरून एका विद्यार्थ्याचे पालकत्व स्विकारण्याची “दत्तक योजना” इथे सुरु आहे. येत्या १९ फेब्रुवारी २०२४ रोजी रोटरी गतीमंद विद्यालय व खामगांव औद्योगिक परिसरात असलेल्या रोटरी इंग्लिश स्कुल यांच्यासाठी न्यू ईरा हायस्कुलच्या भव्य प्रांगणावर कवीसंमेलनाच्या स्वरूपात “निधी उभारणी” कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यायोगे झालेला नफा हा या दोन विद्यालयांना वर्षभर संचालित करण्याकरिता उपयोगात आणल्या जाईल. विद्यालयाच्या भरभराटीसाठी किंवा देणगी प्रदान करण्यासाठी ईच्छुक व्यक्तींनी विद्यालयाचे अध्यक्ष श्री दीपक अग्रवाल गाडोदिया (मोबाईल क्रमांक ९४२२१८०८९३) किंवा श्री राजीव नथाणी (मोबाईल क्रमांक ९४२२१८०२७८) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष श्री सुरेश पारीक व रोटरी मानव सेवाचे अध्यक्ष डॉ आनंद झुनझुनुवाला यांनी केलेले आहे.