चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीत मुलांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे गावातील ८ वर्षीय बालकाचा नदी पात्रात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यश राजेंद्र पवार वय ८ रा. वरखेडे ता. चाळीसगाव असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यश पवार हा बालक आपल्या पालकांसोबत चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे वास्तव्याला आहे. मंगळवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता गावाजवळ असलेल्या गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गावातील काही मुलांसोबत गेलेला होता. तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो पाण्यात वाहून गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरात ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन सोनवणे करीत आहे.