नवी दिल्ली । रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. त्यामुळेआता कामरा यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला चालणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीविरोधात केलेल्या ट्विट प्रकरणी कामरा यांच्या विरोधात खटला चालवला जाण्याची परवानगी ऍटॉर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी दिली. ‘सर्वोच्च न्यायालयावर विनाकारण टीका केल्यानं शिक्षेचा सामना करावा लागू शकतो, हे लोकांना समजायला हवं. विनोद आणि अपमान यांच्यात एक सीमारेषा असते. कामरा यांच्या ट्विटनं ती सीमा ओलांडली आहे,’ असं वेणुगोपाल म्हणाले.
‘कामरा यांचं ट्विट सर्वोच्च न्यायालय आणि न्यायाधीश यांच्या निष्ठेचं अपमान करणारं आहे. आज काल लोक अतिशय उघडपणे सर्वोच्च न्यायालयावर टीका करतात. त्यांना ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटतं,’ असं वेणुगोपाल यांनी म्हटलं. कामरा यांच्या ट्विटला विधि शाखेचा विद्यार्थी शिरांग कटनेश्वरकर आणि दोन वकिलांनी आक्षेप घेतला. त्यानंतर २४ तासांच्या आत वेणुगोपाल यांनी कामरा यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे.