नागपूर प्रतिनिधी | आशीष शेलार हे शिवसेनेच्या विरूध्द अतिशय आक्रमकपणे बोलत असल्याने त्यांना शांत करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याची शंका व्यक्त करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जोरदार पाठराखण केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंबंधी केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे. दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी शिवसेनेवर टीका करत गंभीर आरोप केले आहेत.
नागपुरात पत्रकारांशी बोलतांना फडणवीस म्हणाले की, भाजपाचा कोणताही नेता आणि विशेषत: आशिष शेलार हे कोणत्याही महिलेबद्दल अभद्र किंवा चुकीचा शब्द वापरु शकत नाहीत, महापौरांबद्दल तर अजिबात नाही. काल त्यांची पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट याचा चुकीचा अर्थ काढून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष शेलार शिवसेनेविरोधात आक्रमकतेने बोलतात म्हणून त्यांना शांत करण्यासाठी कदाचित गुन्हा दाखल आला का हा देखील एक प्रश्न आहे. तसेच महापौर किंवा कोणत्याही महिलेबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यामुळे आशिष शेलार किंवा भाजपा कोणीही त्यांच्याबद्दल वाईट किंवा चुकीचे शब्द वापरु शकत नाही, असंही ते म्हणाले.