जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून शासनाच्या महसूल विभागातर्गत तलाठी (गट क) पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये राजेश रामभाऊ गेठे (रा. अमरावती), भुषण रघुनाथ पाटील (रा. गोताणे, जि. धुळे) व भागवत जनार्दन परिहार (रा. अंजरवाडी, ता. चिखली, जि. बुलढाणा) या तिघांनी संगणकीय गैरप्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवार ३० मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजता तिघांविरोधात जिल्हापेठ पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट क) संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरतीसाठी पुणे येथील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जाहीरात प्रसित्र करण्यात आली होती. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तलाठी सवर्गातील रिक्त पदांचा समावेश होता. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. १२ मार्च रोजी पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मेलवर पाठविण्यात आलेला होता. यामध्ये राजेश गेठे, भुषण पाटील व भागवत परिहार या उमेदवारांच्या नावापुढे स्टार मार्क करुन त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. त्यानंतर १४ मार्च रोजी या निकालाची यादी सर्वांसाठी प्रसिद्ध करणयात आली होती, तर यातील उमेदवारांना २२ मार्च रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले होते. जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या यादीमध्ये तिघ उमेदवारांच्या नावापुढे शेरा मारण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तिघ उमेदवारांची परीक्षेमध्ये त्यांनी काय गैरप्रकार केला, कोणत्या अवैध मार्गाचा अवलंब करुन प्रश्नपत्रिका सोडविली, अशी विचारपुस केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात होती. याबाबत पुढील प्राथमिक चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कळविण्यात आले होते. त्यानंतर शनिवार 30 मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता तहसीलदार ज्योती गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.