लखनऊ वृत्तसंस्था | लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर कार सोडून चार जणांची हत्या करण्याच्या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कार्यक्रमासाठी लखीमपूरच्या दौर्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आणि काही कार्यकर्ते दोन तीन गाड्यातून गेले. ज्या मार्गावर ते होते त्याच मार्गावर कृषी कायद्यांच्याविरोधात काही शेतकरी आंदोलन करत होते. भाजप कार्यकर्ते आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली आणि केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलानं आंदोलक शेतकर्यांच्या अंगावरच थेट गाडी घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर, आंदोलक शेतकर्यांनीच आधी दगडफेक केली आणि त्यातूनच मग वाद वाढत गेला. त्याच घटनेत भाजपच्या ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप भाजप समर्थकांकडून होत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे युपीत प्रचंड तणाव पसरला आहे. यातून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात आशिष मिश्रा हा आरोपी असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांसह राजकीय पक्षांनी केली होती. यानुसार अतिा आशिष मिश्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.