धुव्र राठीचा व्हिडीओ व्हॉट्सॲप गृपमध्ये शेअर केल्याप्रकरणी वकिलांवर गुन्हा दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा एक व्हीडिओ व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केल्याने वसईतील एका वकिलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्रुव राठीचा हा व्हीडिओ आदेश बनसोडे यांनी फॉरवर्ड केला होता. आदेश बनसोडे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशनचे महाराष्ट्र सचिव अधिवक्ताही आहेत. बनसोडे यांनी पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी २० मे रोजी वसईच्या बार असोसिएशनच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये “माइंड ऑफ अ डिक्टेटर” या व्हीडिओची लिंक शेअर केली होती. लिंकसोबतच त्यांनी एक मेसेज लिहिला की, “मतदानाला जाण्यापूर्वी व्हिडिओ पहा.

हा व्हीडिओ शेअर केल्याबद्दल बनसोडे यांच्याविरोधात ग्रुपमधील एका वकिलाने पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी स्वत: तक्रार दाखल केली आणि २१ मे रोजी गुन्हा नोंदवला. एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की आरोपीने शेअर केलेल्या व्हीडिओने पोलीस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले आहे. कारण त्याच्या संदेशात उमेदवारांबद्दल खोटे दावे करण्यात आले आणि मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला. मतदानाच्या निमित्ताने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी १८ मे ते २० मे दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता.

बनसोडे यांनी एफआयआर बेकायदा ठरवत लोकांचा आवाज दाबण्यासाठी ही राज्याची चाल असल्याचा आरोप केला. भारतीय दंड संहिताच्या कलम १८८ (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा) एफआयआर दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही, असेही ते म्हणाले. बनसोडे म्हणाले, “सीआरपीसी कलम १९५ नुसार, आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यापूर्वी पोलिसांना संबंधित न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

Protected Content