अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खानदेश आणि विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा राज्याचा हा अर्थसंकल्प असून, तापी खोऱ्याच्या मेगा रिचार्जसाठी विशेष भर देण्यात आला आहे. मागील वर्षी २५० कोटींच्या अनुदानानंतर यावर्षी पाडळसरे प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की, “हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला आणि युवकांच्या सर्वांगीण विकासाचा समतोल साधणारा आहे. सिंचन सुविधांमुळे शेतकरी समृद्ध होऊ शकतो, तर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होणार आहे.”
या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. रस्ते जाळ्याच्या विकासामुळे दळणवळण सुधारेल आणि ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून शेतकरी स्वावलंबी होईल. या निर्णयामुळे संपूर्ण राज्याच्या प्रगतीस गती मिळणार आहे.पाडळसरे धरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद झाल्यामुळे आनंद असला तरी या प्रकल्पाचा समावेश अद्याप प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून आणखी निधीची अपेक्षा आहे.
पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी यांनी सांगितले की, “सध्या प्राप्त निधी आणि मागील वर्षी मिळालेला निधी एकत्रितपणे जून महिन्यापर्यंत खर्च व्हावा, तसेच कोणतीही आर्थिक अनियमितता होऊ नये, याकडे समिती लक्ष ठेवेल.”या निधीचा योग्य प्रकारे उपयोग करून धरणाचा कामकाज वेळेत पूर्ण व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि समितीने केली आहे. राज्य शासनाकडून आणखी आर्थिक सहाय्य मिळावे, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.