भरधाव कंटेनरने दुचाकीस्वाराला उडविले; वकीलाचा दुदैवी मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानक परिसरातील पक्षाकारांकडे कागदपत्र घेण्यासाठी जात असलेल्या वकीलाला कंटेनरने धडक दिल्याची घटना सोमवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नेहरू चौकात घडली. या अपघातात योगेश जालमसिंग पाटील (वय-४५, रा. दादावाडी,जळगाव) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. धडक देणार्‍या कंटेनरसह चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मूळचे चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील योगेश पाटील हे सद्या दादावाडी परिसरात वास्तव्यास होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते जिल्हा न्यायालयात वकीली करत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ते त्यांच्या ऑफिसमधील सहकार्‍यांना रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या पक्षकाराकडे कागदपत्रे घेण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर योगेश पाटील हे त्यांच्या (एमएच १९ सीई ६५११) क्रमांकाच्या दुचाकीने नेहरु चौकातून रेल्वे स्थानकाकडे जात होते. याचवेळी रेल्वे स्थानकाकडून टॉवरचौकाकडे जाणार्‍या (एमएच १९ सीवाय २२३१) क्रमांकाच्या कंटेनरने योगेश पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील यांच्या छातीला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अपघातात योगेश पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच न्यायालयातील त्यांच्या सहकार्‍यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content