जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कामावरून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणाच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिल्याची घटना शुक्रवारी ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ हॉटेल सुगोकीजवळ घडली होती. या भीषण अपघातात जखमी झालेला दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मंगळवारी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दत्तू प्रकाश पाटील वय ३४ रा. फुलपाट ता. धरणगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील फुलपाट गावात दत्तू पाटील हा तरूण आईवडील, पत्नी, भाऊ आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. टाकरखेडा येथील एका कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम पाहत होता. दैनंदिनीप्रमाणे शुक्रवारी ५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दत्तू पाटील हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीटी १०१५) ने कंपनीतून घरी फुलपाट येथे जाण्यासाठी निघाला. त्यावेळी पाळधी गावातील सुगोकी हॉटेलसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत दत्तू पाटील हा गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी ८ जुलै रोजी रात्री ११ वाजता प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे कुटुंबाने मोठा अक्रोश केला. मंगळवारी ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेबाबत पोलीसात नोंद करण्याचे काम सुरू होते.