जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणाऱ्या वारली चित्रकलेचा देखणा आविष्कार सध्या जळगावकरांच्या भेटीला आला असून भुसावळचे प्रसिद्ध चित्रकार रमाकांत भालेराव यांच्या चित्रप्रदर्शनाचे जळगावातील पी. एन. गाडगीळ (पीएनजी) कलादालनात दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
सोमवार, दि. १६ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आणि रसिकांसाठी प्रदर्शन खुले करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी जळगावच्या महापौर दीपमाला काळे, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, अनिल कोष्टी, बिपिन शहा, योगेश मांडे तसेच पीएनजीचे व्यवस्थापक गिरीशजी ढेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी कलाकाराच्या कलाकृतींचे कौतुक करत या उपक्रमाचे स्वागत केले.

हे चित्रप्रदर्शन पी. एन. जी. कलादालन, जळगाव येथे १६ मार्च ते ३० मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून दररोज सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे. मात्र दर बुधवारी प्रदर्शनास सुटी राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या प्रदर्शनात रमाकांत भालेराव यांनी साकारलेल्या विविध वारली चित्रकृतींचा समावेश असून प्रत्येक चित्रातून ग्रामीण व आदिवासी जीवनाचे जिवंत दर्शन घडते.
वारली चित्रकला ही महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असून साध्या रेषा आणि प्रतीकांद्वारे निसर्ग, मानवी जीवन, सण-उत्सव आणि सामाजिक घडामोडींचे प्रभावी चित्रण केले जाते. भालेराव यांनी आपल्या कुंचल्यातून आदिवासी जीवनशैली, निसर्गाशी असलेले नाते आणि लोकसंस्कृतीचे विविध पैलू अत्यंत प्रभावीपणे मांडले आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन कला रसिकांसाठी एक खास अनुभव ठरत आहे.
उद्घाटनप्रसंगी महापौर दीपमाला काळे यांनी जळगावच्या सांस्कृतिक समृद्धीत अशा उपक्रमांमुळे मोठी भर पडते, असे मत व्यक्त केले. तसेच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले. शहरातील कला प्रेमींनी या प्रदर्शनाला भेट देऊन वारली कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



