Home Agri Trends फैजपुरात रंगणार ‘केळी महोत्सव’ आणि भव्य कृषी प्रदर्शन !

फैजपुरात रंगणार ‘केळी महोत्सव’ आणि भव्य कृषी प्रदर्शन !


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी पिकाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी फैजपूर येथे भव्य ‘कृषी प्रदर्शन व केळी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव कृषी विभाग आणि पाल येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने हा महोत्सव ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.

विविध उपक्रमांची रेलचेल :
येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी कॉलेज शेजारील विस्तीर्ण मैदानात हा तीन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या महोत्सवात केवळ प्रदर्शनी नसून, शेतकऱ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी ‘केळी घट स्पर्धा’ आणि गृहिणींच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘केळी पाककला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून केळीपासून तयार होणाऱ्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचे प्रदर्शनही घडणार आहे.

शेतकऱ्यांचा गौरव आणि मार्गदर्शन :
माजी आमदार शिरीशदादा चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की, या महोत्सवात शेती क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. प्रदर्शनात शेतीसाठी लागणाऱ्या आधुनिक अवजारांचे आणि खत-बियाण्यांचे भव्य दालन उपलब्ध असेल. यामुळे शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी पंढरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound