ठाणे (वृत्तसंस्था) आपल्या मित्रासोबत एक १५ वर्षीय मुलगी एकटी असल्याचे हेरत दोन लोकांनी तिच्या मित्रासह पिडीत मुलीला झाडाला बांधत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना विरारमध्ये घडली असून पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे.
अवघा देश निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार परिसरात इयत्ता ९वीत शिकणाऱ्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी बुधवारी विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलीचा मित्र किशोर याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, पीडित मुलगी आपल्या नातेवाईकांच्या घरी जात होती. त्यावेळी रस्त्यात तिचा शाळेतील मित्र (१६) तिला भेटला. त्यावेळी तिथे दोन लोक आले. दोघांनी त्यांना शाळेच्या मागील परिसरात एका उजाड जागेवर खेचत नेले. दोघांनी किशोरला एका झाडाला बांधले आणि दोघांनी पीडित मुलीला झाडीच्या मागे नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला.