.
वाशिंग्टन : वृत्तसंस्था । जो बायडेन यांच्या प्रचार टीमने ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिला तर व्हाइट हाऊसमधून एस्कॉर्ट केलं जाईल असं सांगितलं आहे. दुसरीकडे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प परभवाच्या छायेत असतानाही तो मान्य करण्यास तयार नाहीत.
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प वारंवार मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करत असून कोर्टातही धाव घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जो बायडेन यांना चुकीच्या पद्धतीने राष्ट्राध्यक्ष पदावर दावा करु नये अशा इशारा दिला आहे.
जो बायडेन यांनी पेन्सिलवेनिया आणि जॉर्जियामध्ये आघाडी घेतली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प मात्र आपण पिछाडीवर असल्याचं मान्य करण्यास तयार नसून वारंवार मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप करत आहेत.
“ज्याप्रमाणे आम्ही १९ जुलैला म्हटलं होतं की, अमेरिकेची जनता निवडणुकीचं भवितव्य ठरवेल. आणि अमेरिकन सरकार ट्रेसपास करणाऱ्यांना योग्य प्रकारे एस्कॉर्ट करण्यात समर्थ आहे,” असं जो बायडेन यांच्या प्रचारमोहीमेचे प्रवक्ते अॅण्ड्रू बेट्स यांनी म्हटलं आहे. जुलै महिन्यात ट्रम्प यांनी निकाल मान्य करण्यास तसंच पराभव झाल्यास सत्ता दुसऱ्याकडे सोपवण्यास नकार दिला होता.
मतमोजणी अद्यापही सुरु असून यामध्ये डेमोक्रॅटिकचा प्रभाव असणारी अनेक ठिकाणं आहेत. पेन्सिलवेनियामध्ये जो बायडेन यांनी नऊ हजार मतांसोबत आघाडी घेतली आहे. बायडेन यांचं भवितव्य ठरवण्यासाठी पेन्सिलवेनिया आणि त्यांचे २० इलेक्टोरल व्होट्स बायडेन यांना २७० चं बहुमत मिळवून देऊ शकतात.
बायडेन यांना जॉर्जियामध्ये आघाडी मिळाली आहे. एकेकाळी रिपब्लिकनचा गड म्हणून ओखळल्या जाणाऱ्या जॉर्जियाने शुक्रवारी मतांची फेरमोजणी करत असल्याचं जाहीर केलं होतं.
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक विधानं करत असताना जो बायडेन मात्र शांत आहेत. गुरुवारी विल्मिंगटन येथे पत्रकारांशी ते शेवटचे बोलले होते. आपल्याला विजयी म्हणून जाहीर करतील यात कोणतीही शंका नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी सिक्रेट सर्व्हिसने तयारी केलेली आहे