यावल, प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या शासनाच्या गोठा अनुदान प्रकरणी देण्यात आलेल्या अनुदानाचा मोठया प्रमाणावर गैरवापर करणाऱ्यांना लाभार्थ्यांना नोटीसा पाठविण्यात येत असून , प्रसंगी या प्रकरणाची तालुका पातळीवरील बोगस लाभार्थ्यांच्या शोधमोहीमे साठी चौकशी कामी समिती नियुक्त करणार असल्याची माहीती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील यांनी माहीती दिली आहे .
यावल पंचायत समितीच्या माध्यमातुन ग्रामीण पातळीवर गुरेढोरे , शेळ्यांच्या पालनपोषण करण्यासाठी शासनाच्या वतीने गोठयांच्या उभारणी करीता अनुदान दिले जात असते. यावल तालुक्यात अशा प्रकारे या योजनेचा लाभ सुमारे १२५ नागरीकांनी घेतल्याचे शासन दरबारी नोंद आहे. मात्र यातील अनेक लाभार्थ्यांनी गोठ्यांच्या उभारणीसाठी घेतलेल्या अनुदान लाभाचा लाभ घेवुन गोठयांची उभारणी न करता मिळालेल्या अनुदानाचा मोठया प्रमाणावर दुरूपयोग केल्याच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळी वेळी पंचायत समितीकडे लेखी तक्रार करून कळविले आहे. या तक्रारींची दखल घेत अखेर गटविकास अधिकारी यांनी गोठयांच्या नांवाखाली अनुदान लाटणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. युद्धपातळीवर गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी या गोठयांच्या नावांखाली शासनांची फसवणुक करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांच्या शोध मोहीमेस सुरूवात करून या प्रकरणी अनुदान लाटणाऱ्यांकडून शासनाने दिलेले पैसे हे वसुल करण्यात येणार आहेत. गोठयांचे काम न करता अनुदान लाटणाऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.