अहमदनगर: वृत्तसंस्था । धनगर आणि धनगड याचा टाटा समाजिक संस्थेचा संशोधन अहवाल दोन वर्षांपूर्वीच सरकारला सादर झाला आहे. हा अहवाल प्रसिद्ध करा , अशी मागणी भाजपचे नेते मधुकर पिचड यांनी केली आहे. आदिवासींमध्ये समावेश करून धनगरांना आरक्षण देण्यासही त्यांनी विरोध दर्शविला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पिचड यांनी मागणी केली आहे. दसरा मेळाव्यात आदिवासी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता धनगरांना वेगळे आरक्षण देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्याबद्दल पिचड यांनी ठाकरे यांचे आभार मानले
पिचड यांनी म्हटले आहे की, आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगरांचा समावेश करू नये. धनगर समाजाला आदिवासी व्यतिरिक्त स्वतंत्र आरक्षण दिल्यास आदिवासी समाजाची त्याला हरकत असणार नाही. मात्र ४७ जमातीत त्याचा समावेश होऊ नये. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाचे म्हणणे आहे की, आम्ही धनगड आदिवासी या जातीचे आहोत. धनगड ही जात आदिवासी आहे म्हणून आमचा आदिवासी समाजामध्ये समावेश करून घेण्यात यावा. कोणतीही जात आदिवासी ठरण्याकरीता केवळ नावावर नाही तर आदिवासी जमातीचे राहणीमान, रुढी, परपंरा, बोलीभाषा, सांस्कृतिक परपंरा, वेगळेपणा, नैसर्गिक जंगलात राहण्याची पद्धती असे अनेक वैशिष्ट्ये पाहिली जातात. आदिवासी जात नाही जमात असते म्हणून ही वैशिष्ट्ये आदिवासींची आहेत.
सत्यता पडताळण्यासाठी पुण्यातील आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेकडे काम सोपविण्यात आले होते. संस्थेनी स्पष्टपणे सांगितले होते की धनगर हे धनगड आदिवासी नाहीत. परंतु धनगर समाजाच्या नेत्यांनी या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था यांच्या म्हणण्याला विरोध केला व तटस्थ संस्थेमार्फत संशोधनाची मागणी केली.
त्यानंतर मुंबईच्या टाटा सामाजिक संस्थेकडे हे काम सोपविण्यात आले. या संस्थेने सर्व कागदोपत्री पुरावे तपासले. महाराष्ट्रातील आदिवासी विभागात व धनगर सामाजाच्या जास्त लोकवस्ती असलेल्या विभागाला भेटी दिल्या.गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडीसा, झारखंड या राज्यामध्ये जाऊन देखील तपासणी केलेली आहे.
टाटा सामाजिक संस्थेने सरकारला दिलेला अहवाल त्वरीत प्रसिध्द करण्यात यावा, व खरे खोटे स्पष्ट करुन महाराष्ट्रातील आदिवासी लोकांच्या समोर आणावे. सध्या आदिवासी सामाजाला दिलेल्या ७.५ टक्के आरक्षणामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करु नये, असेही पिचड यांनी म्हटले आहे.