मेरठ, (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था । ‘इस्लामिक कट्टरतावाद संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प विजयी होणं गरजेचं आहे’ असं सांगत हिंदू महासभेकडून ट्रम्प विजयासाठी मंत्रोच्चार आणि होम-हवनाचं आयोजन करण्यात आलं.
अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीचा प्रभाव भारतातही दिसून येतोय. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामिक कट्टरतावादाला संपुष्टात आणण्याची प्रार्थना करत हवनात आहुती देत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची कामना केली. सोमवारी राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडित अशोक शर्मा आणि जिल्हाध्यक्ष अभिषेक अग्रवाल यांच्या नेतृत्वात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं होतं.
शारदा रोड स्थित अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यालयात प्रत्येक वर्षी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीवर गोळीबार करणाऱ्या नथूराम गोडसेची पूजा केली जाते. संघटनेचे कार्यकर्ते गोडसेच्या विचारधारेला आपला आदर्श मानतात.
यज्ञात मंत्रोच्चारादरम्यान आहुती देत अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच मत देण्याचं आवाहन हिंदू महासभेनं केलं. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले तर जगातून ‘इस्लामिक कट्टरतावाद’ संपुष्टात येईल. हत्यारांच्या बळावरच जगात शांती आणली जाऊ शकते, असा दावा शर्मा यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसं डोनाल्ड ट्रम्प यांचं नेहमीच समर्थन केलं त्याच पद्धतीने डोनाल्ड ट्रम्पदेखील भारताच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील आणि दहशतवादाला रोखण्यासाठी प्रयत्न करतील, असाहा दावा अग्रवाल यांनी केला.