श्रीनगर : वृत्तसंस्था । काश्मीरात अशांतता पसरवणाऱ्या हिजबुल मुजाहिदीनचं लष्करानं रविवारी कंबरडंच मोडलं. कारवाईत लष्करानं हिजबुलचा मुख्य कमांडर डॉ सैफुल्ला मीर ऊर्फ डॉक्टर साहब याचा खात्मा केला. श्रीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
काश्मिरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की, रंगरेथ भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्करानं मोहीम घेतली. यावेळी लष्करानं केलेल्या कारवाईत हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा मुख्य कमांडर डॉ. सैफुल्ला मरण पावला. त्याच्या एका सहकाऱ्याला जिवंत पकडण्यात आलं आहे.
ज्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्याठिकाणी जम्मू काश्मीर पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनी मोहीम हाती घेतली. दबा धरून बसलेल्या दहशतावाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यानंतर जवानांनी गोळीबार सुरू केला. यात मुजाहिदीनचा मुख्य म्होरक्या डॉ. सैफुल्ला मीर उर्फ गाझी हैदर उर्फ डॉक्टर साहब हा जागीच ठार झाला. एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात लष्कराला यश आलं.
. या कारवाईत सैफुल्लासह दोन ते तीन अतिरेकी ठार झाले काही दिवसांपूर्वी भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या हत्येमागे सैफुल्लाचा हात होता,” असं जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
हिजबुलचा म्होरक्या सैफुल्ला मीर हा २०१४ मध्ये संघटनेत सहभागी झाला होता. तो पुलवामातील मलंगपोरा येथील आहे. सैफुल्लाला रियाज नायकू यानं संघटनेत घेतलं होतं. त्याचबरोबर गाझी हैदर असं नावही दिलं होतं. रियाज नायकू मे मध्ये झालेल्या चकमकीत ठार झाल्यानंतर हिजबुल मुजाहिदनचं नेतृत्व सैफुल्लाकडे आलं होतं.