बेळगाव वृत्तसंस्था l कर्नाटक दिनाच्या दिवशी कानडी जुलूमशाहीच्या विरुद्ध मराठी भाषिकांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या निषेध कार्यक्रमात कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या सदस्यांनी धुडगुस घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे
एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याच्या स्थापना दिन आहे. हा दिवस मराठी भाषिकांचा तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून निषेध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कन्नड भाषिक सरकार हे मराठी भाषिकांवर अत्याचार करत असल्याच्या निषेधार्थ याचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने यंदादेखील निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र हा कार्यक्रम सुरू होतात कन्नड रक्षक वेदिके या संघटनेच्या सदस्यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी धुडगूस घातला असून यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमात मराठी भाषिकांनी पोहोचू नये म्हणून पोलिसांनी परिसरातील नाकेबंदी केली असून लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. मराठा मंदिर येथील आंदोलन स्थळापर्यंत जनता पोहोचू नये यासाठी पोलीस दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब करत असल्याचे आज दिसून आले आहे. आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांवर नाकाबंदी करण्यात आलेली आहे. काळे कपडे घातलेल्या लोकांना जाब विचारण्यात येत आहे यामुळे मराठी भाषिकांनी पोलिसांच्या मुस्कटदाबी चा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.