सातारा । केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या आपत्तीसाठी आमदार आणि खासदारांचा निधी घेतला असला तरी याचे झाले काय ? असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.
सातारा येथील राजघराण्याचा दसरा साधेपणाने साजरा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना उदयनराजे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, खासदार आणि आमदारां तुम्ही दोन वर्षांचे निधी तुमच्याकडे घोटवून घेतले त्याचं केंद्र आणि राज्य सरकारनं काय केलं ते गेले कुठे? दिवस रात्र एकच झाली आहे. आम्हाला बेड पाहिजेत, ऑक्सिजन पाहिजेत, असे फोन येतात. माझा एकच प्रश्न हे घोटून घेतलेले पैसे गेले कोठे? गोर गरिबांना सुख-सुविधा मिळत नाहीत. याचं उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिलच पाहिजे. आता लोकांनी जाब विचारणं गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे बोलतांना उदयनराजे म्हणाले की, कोरोनामुळे रुढी परंपरेला फाटा, जिव्हाळा, पाहुणे, मित्रमंडळी यांना या कोरोनाने हिरावले आहे, आईचरणी प्रार्थना आहे हे थांबलं पाहिजे. ो काल होता तो आज नाही. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन देखील खासदार उदयनराजे यांनी केले आहे.