मुंबई वृत्तसंस्था । सध्या सुरू असणार्या आयपीएलमधील समालोचन हे मराठीतून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली असून याबाबतचा इशारा देणारे पत्र प्रक्षेपणाचे अधिकार असणार्या डिस्ने हॉटस्टारला देण्यात आलेले आहे.
सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलं आहे. यासंदर्भातील माहिती मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी कंपनीने मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती या पत्रामध्ये मनसेने केली आहे. तसेच पत्राच्या शेवटी कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर ‘मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी,’ असंही मनसेनं म्हटलं आहे. सध्या आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून अॅपमध्ये मराठीचा पर्याय देण्यात आलेला नाही असं मनसेनं म्हटलं आहे. आय.पी.एल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केलीत तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असु द्या..”, अशी कॅप्शन देत केतन यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केलं आहे.
आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी आहे असं असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, अशा शब्दात मनसेने कंपनीला खडे बोल सुनावले आहेत.