नवी दिल्लीः वृत्तसंस्था । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल हेल्थ क्लिनिकल प्रोटोकॉलमधून प्लाझ्मा थेरपी काढून टाकण्याचा विचार करत आहे . कोरोनाने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी फार प्रभावी नाही, असं आयसीएमआरने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.
आयसीएमआरने यापूर्वी बर्याच वेळा प्लाझ्मा थेरपीवर प्रश्न उपस्थित केले होते. कोरोनाच्या उपचारात प्लाझ्मा थेरपीऐवजी अँटीसेरा आता पर्याय म्हणून वापरला जाऊ शकतो. प्राण्यांच्या रक्ताच्या सीरमचा वापर करून अत्यंत शुद्ध अँटीसेरा विकसित केल्याचा दावा आयसीएमआरने केला आहे.
अँटिसेरा हे प्राण्यांच्या रक्तातून मिळालेले सीरम आहे. यामध्ये विषाणूंविरोधात लढण्यासा खास अँटिबॉडी असतात. विशिष्ट रोगांच्या उपचारांमध्ये त्यांचा उपयोग होत आला आहे, असं आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितलं.
कोरोना संकटाच्या वेळी प्लाझ्मा थेरपी चर्चेत आली. बऱ्या झालेल्या रूग्णाच्या शरीरातून घेतलेला प्लाझ्मा संसर्ग असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडला जातो. यामुळे रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते. भारताव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरिया, इटली, तुर्की आणि चीनसह अनेक देशांमध्ये याचा वापर केला जात आहे.