जामनेर प्रतिनिधी । नुकत्याच जामनेर येथे झालेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पीटलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बाँब स्फोट करण्याची धमकी देणारा हा बस खात्यात काम करणारा कंडक्टर निघाला असून त्याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत देणार्या अमोल राजेंद्र देशमुख या पाचोरा डेपोच्या वाहकास गुरूवारी पाचोरा बस स्थानकावरून ताब्यात घेतले. कुर्हाड ता.पाचोरा येथील मुळ रहिवासी व हल्ली मुक्काम पहूर येथे असणार्या अमोल राजेंद्र देशमुख यांच्या मोबाईलवरुन धमकी मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अमोल हा पाचोरा डेपोत वाहक असून बुधवारी तो पाचोरा-कल्याण बस घेऊन मुंबईला गेला होता. गुरूवारी सायंकाळी ही बस कल्याणवरून पाचोरा डेपोत परतली. बसमधून उतरताच अमोल देशमुख यास पोलिस पथकाने ताब्यात घेऊन जामनेर पोलिस ठाण्यात आणले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.