जळगाव प्रतिनिधी । शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकींची चोरी झाल्याने या चोरट्यांना जेरबंद करण्याचे आव्हान शहर पोलीसांसमोर उभे राहिले आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, उस्मानिया पार्कमधील मोहंमदिया नगरातील शाहरुख इकबाल पिंजारी (२६) हे एसी टेक्निशिअन असून त्यांच्याकडे (एमएच १९ ६१७५) क्रमांकाची दुचाकी आहे. तर त्यांच्या शेजारी राहणारे जुबेरखान अहमद रसूल खान (४०) हे उर्दू हायस्कुलमध्ये क्लार्क असून त्यांच्याकडे आहे. दोघांनी रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकी घराबाहेर उभ्या केल्या होत्या. जुबेरखान यांच्याकडे पाहुणे येणार असल्याने ते जागीच होते. रात्री ११ वाजेपर्यंत आपली दुचाकी घरसमोर दिसून आली त्या नंतर ते झोपी गेले.
बुधवारी सकाळी जुबेरखान हे ड्युटीवर जाण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी शेजारी राहणार्यांना आपली दुचाकी पाहिली का विचारले असता शाहरुख पिंजारी यांच्या आई घराबाहेर आल्या. त्यांना आपल्या मुलाची दुचाकी दिसून न आल्याने त्यांनी तात्काळ ही माहिती शाहरुख पिंजारी यांना दिली. त्यांनी तात्काळ संपूर्ण परिसरात दुचाकींचा शोध घेतला परंतु मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली असून याप्रकरधी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुले मार्केटमधून मोटारसायकल लंपास
मुलीकडे असलेल्या पुणे येथील गोपालदास राधोमल नारवाणी (६२) हे खरेदी करण्यासाठी फुले मार्केटमध्ये आले. त्यांनी आपली (एमएच १९ डीएफ ०६०८) क्रमांकाची दुचाकी फुले मार्केटसमोर लावली होती. खरेदीकरुन आल्यानंतर ते दुचाकीजवळ आल असता त्यांना आपली दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत दुचाकी चोरीची तक्रार दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.