नंदुरबार वृत्तसंस्था । माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शरद पवारांशी पॉझिटिव्ह चर्चा झाल्याचे सांगितले आणि नवरात्रीच्या पहिल्या माळेला आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार, असे खात्रीपूर्वक सांगितल्याचा दावा राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार आणि खडसे समर्थक उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.
उदेसिंग पाडवी यांनी सांगितले की, “मागच्या सोमवारी मी मुक्ताईनगरला गेलो होतो. त्यावेळी नुकतेच साहेब (एकनाथ खडसे) मुंबईहून परत आले होते. मुंबईला काय घडलं, याबाबत माझ्या मनात उत्सुकता होती. देशाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसेंची चर्चा होणार होती, याची मला पूर्ण कल्पना होती. त्या उत्सुकतेपोटी मी जळगावला गेलो, माझ्यासोबत भाजपमध्ये असलेले माझे मित्र डॉ. स्वानंद आणि डॉ. आघाडे होते” अशी माहिती उदेसिंग पाडवी यांनी दिली.
“खडसेंच्या आदेशानेच मी 9 सप्टेंबरला मुंबईला गेलो. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने, जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला” असे पाडवींनी सांगितले. मी सोमवारी त्यांना भेटून “मुंबईतून आनंदाची बातमी आणली का?” असे विचारले. “पॉझिटिव्ह चर्चा झाली, उहापोह झाला. आठ दिवसात आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार म्हणजे करणार” असे खडसेंनी सांगितल्याचा दावा पाडवींनी केला. “राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा कोटा आहे. त्यापैकी 4 ते 5 राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील. त्यामध्ये एक जागा एकनाथ खडसे यांची निश्चित आहे. असा विश्वासही पाडवींनी व्यक्त केला.