गाझियाबाद: वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील मोदीनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी आयएएस सौम्या पांडेय या कर्तव्यदक्ष महिलेने कोरोना संकटातील जबाबदारी समजून प्रसूतीनंतर २२ दिवसांनी कार्यालयात काम सुरू केले. स्वत:ची व चिमुकलीची देखील काळजी घेत त्या जबाबदारी पार पाडत आहेत.
प्रयागराजला राहणाऱ्या सौम्या पांडेय या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या गाझियाबादमध्ये मोदीनगर उपविभागीय दंडाधिकारी या पदावर त्या काम करत आहेत. सौम्या पांडे यांनी कोरोनाकाळात अतिशय उत्तम काम केले. सौम्या यांनी मुलीला जन्म दिल्यानंतर केवळ १४ दिवसाचीच रजा घेतली आणि पुन्हा त्या कर्तव्यावर रुजू झाल्या. आता कार्यालयात त्या आपल्या मुलीला मांडीवर घेत काम करताना दिसत आहेत.
ज्या पदावर माझी नियुक्ती करण्यात आली आहे त्याला न्याय देणे मी माझे कर्तव्य समजते असे आयएएस सौम्या पांडेय म्हणाल्या. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी अनेक रुग्णालयांचे दौरे केले आहेत. कोविड-१९ चा काळ असल्याने त्या आपल्या नवजात मुलीची विशेष काळजी घेताना दिसतात. सर्व फाइल्स देखील त्या पुन्हा पुन्हा सॅनिटाइझ करतात. मी गर्भवती असल्यापासून आतापर्यंत गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने मोठे सहकार्य केले असल्याचे त्या म्हणाल्या.