जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या संसदीय समितीची बैठक झाली असून यात निश्चित केलेल्या नावांची यादी दिल्लीस पाठविण्यात आली असून यामुळे जळगाव व रावेरमधील उमेदवारीबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाची काल सायंकाळी मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. जिल्ह्यातून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी बैठकीला उपस्थिती लावली. यात जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघासाठी स्वतंत्र चर्चा करण्यात आली. यात दोन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी दोन नावे सुचविण्यात आले आहेत. अन्य मतदारसंघातही याच प्रकारे चर्चा करून संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आलेली आहे. ही यादी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात पाठविण्यात आली असून तेथेच उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच राज्यातील सर्व उमेदवारांची निश्चिती होणार आहे. तर घोषणा मात्र दोन वा तीन टप्प्यांमध्ये होऊ शकते.