मुंबईः वृत्तसंस्था । अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आल्यानंतर जवळपास एक महिन्यांने सीबीआयनं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीच्या आधारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. राज्यातील मंत्र्याला वाचवण्यासाठी मुंबई पोलिस प्रयत्न करत असल्याचे आरोप सातत्याने होत होते. आता दीड महिना होत आला तरी सीबीआयच्या हाती काहीच ठोस पुरावे आले नाहीत. यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआय तपासाच्या निकालासाठी आम्हीही उत्सुक आहोत, असा टोला विरोधकांना लगावला आहे.
‘सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस प्रोफेशनल पद्धतीने हाताळत होते. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआय तपासाचा निकाल काय यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या झाली?,’ असे प्रश्न जनतेच्या मनात आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
सीबीआयनंही सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे. ‘सुशांत प्रकरणात सीबीआय अद्याप कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. सर्व बाजूंनी या तपास सुरू आहे,’ असं सीबीआयनं म्हटलं आहे.