नवी दिल्ली । भारतीय उपग्रहांवर चीन गेल्या अनेक वर्षांपासून सायबर हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आल्याने सीमेवर आगळीक करून शांततेच्या बोलण्याचे नाटक करणार्या चीनचा दुटप्पीपणा पुन्हा समोर आला आहे.
चायना एअरोस्पेस स्टडीज इन्स्टिट्यूट ही एक अमेरिक संस्था असून ती चीनच्या हवाई सामर्थ्यावर नजर ठेवून असते. याच संस्थेने केलेला एक दावा हा खळबळजनक ठरला आहे. चिनी हॅकर्स २००७ पासूनच भारताच्या सॅटेलाईट कम्युनिकेशन नेटवर्कवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचा या संस्थेने दावा केला आहे. संस्थेच्या १४२ पानी अहवालानुसार, २०१२ ते २०१८ दरम्यान चीनने अनेकदा भारतीय नेटवर्कवर हल्ल्याचा प्रयत्न केला. २०१२ मध्ये जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल) वर चीनने नेटवर्कवर सायबर हल्ला केला. या हल्ल्याद्वारे चीनला जेपीएलवर पूर्णपणे नियंत्रण मिळवायचे होते. तसेच चीनने भारताच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनवर २०१७ मध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला होता.
महत्वाची बाब म्हणजे चीनी हल्ले अयशस्वी ठरले असून यात एकदाही भारताचे काही नुकसान झालेले नाही. तथापि, सॅटेलाईट कम्युनिकेशनवर सॅटेलाईट हल्ला हा मोठा धोका भारतासमोर असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनेही या आधी म्हटलेले होते. यामुळे चीनने हाच प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.
चीनी हल्ल्यांमध्ये इस्रोच्या सॅटेलाईट सिस्टीमचे काहीही बिघडलेले नाही, बिघडणार नाही, असे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी स्पष्ट केले आहे. आपली यंत्रणा मात्र पूर्णत: सुरक्षित आहे. आपले नेटवर्क स्वतंत्र आणि अत्यंत दक्ष आहे. इंटरनेटसह कुठल्याही पब्लिक डोमेनशी ते कनेक्टेड (संलग्न) नाही. हीच बाब त्याला सुरक्षित ठेवत असल्याचे सिवन यांनी स्पष्ट केले आहे.