मुंबई वृत्तसंस्था – काळ सायंकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई व उपनगरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
काळ सायंकाळपासून जोरदार पाऊस पडल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे, सीएसएमटी ते वाशी आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाणे ते कर्जत/कसारा, वाशी ते पनवेल आणि अंधेरी ते विरार शटल सर्व्हिस सुरू आहे. . दादर, वरळी, सायन, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. मालाड, अंधेरी, खार या भागांतही पाणी साचले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे.
आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.