जम्मू – जम्मू काश्मीरमध्ये हायवेजवळ ५२ किलो स्फोटकं जप्त करण्यात आली असून पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती टाळण्यात भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजता सर्च ऑपरेशन सुरु असताना एका बागेत पाण्याची टाकी पुरुन ठेवण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं. या पाण्याच्या टाकीत जवळपास ५२ किलो स्फोटकं सापडली. जवळपास ४१६ पाकिटं होती. यामधील प्रत्येक पाकिटात १२५ ग्राम स्फोटकं होती. अजून शोध घेतला असता अजून एक टँक सापडला ज्यामध्ये ५० डिटोनेटर होते. याशिवाय ५० डिटोनेटरही सापडले आहेत. पुलवामा हल्ला झाला होता तेथून काही अतंरावरच इतका मोठा स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
गतवर्षी फेब्रुवारी महिन्यातील १४ तारखेला आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेल्या कारने सुरक्षा ताफ्याला धडक दिली होती. या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.