कोरोनावर मात करून आ. मंगेश चव्हाण परतले; समर्थकांनी केले स्वागत

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाची बाधा झाल्यानंतर या विषाणूवर मात करून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे घरी परतले असून समर्थकांनी त्यांचे अतिशय जोरदार स्वागत केले.

आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच (२२ ऑगस्ट) आमदार मंगेश चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर ते उपचारासाठी मुंबई येथील रूग्णालयात दाखल झाले होते. यानंतर दिनांक १० रोजी ते कोरोनावर मात करून घरी परतले. हितचिंतक व कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण करून तसेच फुल उधळत स्वागत केले. अनेक ठिकाणी लोकांनी फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले.

यानंतर कार्यालयात अनेक जणांनी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, कदाचित जनतेची सेवा केल्याने मिळालेल्या या आशिर्वादाने मी कोरोनावर मात करून पुन्हा त्यांच्या सेवेत येऊ शकलो. सुदैवाने मी खबरदारी घेत असल्याने प्राथमिक लक्षणे आढळताच टेस्ट करून घेतली. त्यामुळे कुटुंबासह जनसेवा कार्यालयात कुणालाच संसर्ग झाला नाही. मात्र, दुर्दैवाने माझ्यासोबत प्रवास केलेल्या माझ्या २ सहकार्‍यांना त्याचा संसर्ग होऊन त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागला. म्हणून या आजारात खबरदारी हीच मोठी जबाबदारी असून लक्षणे आढळताच योग्य उपचार व कुटुंब व लोकांपासून काही काळ दूर राहिल्यास आपल्यालाही त्रास होत नाही. व संसर्गाला ही वेळीच आळा बसतो, असा अनुभव आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.

Protected Content