जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कारागृहातून दोन साथीदारांसह पलायन केलेल्या गौरव विजय पाटील या आरोपीला आज अटक करण्यात आली आहे. बोईसर पोलिसांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून गौरव विजय पाटील व त्याचे दोन साथीदारासह जेल गार्ड यास पिस्तुलाचा धाक दाखवून पळुन गेले होते. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली होती.
त्याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगाव येथे आरोपी यांचे विरुद्ध गु.र.नं. १ ८१/२०२० भा.दं.वि.सं.कलम ३०७, १२०, २०१, ३५३, २२४, २२५, सह आर्म अॅक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयातील आरोपीस शोधाकरीता पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. यातील एका आरोपीला अमळनेर तालुक्यातून अटक करण्यात आली होती.
दरम्यान, यातील दुसरा आरोपी गौरव विजय पाटील हा बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून आरोपी गौरव विजय पाटील ( वय २१ वर्षे, रा. तांबापुरा, ता.अमळनेर) याला जेरबंद करून जळगाव एलसीबी पथकाच्या ताब्यात दिले आहे.