मुंबई । राज्यातील पोलीस अधिकर्यांच्या बदल्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून केल्या असून ती अधिकार्यांची कर्तबगारी व राज्याची गरज पाहून करण्यात आल्याचे सांगत शिवसेनेने आज या प्रकरणी भाजपवर टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामना मध्ये आज पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पोलीस दलात प्रथमच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे टीकेचे तुणतुणे वाजविले आहे. सरकारला बदल्यांशिवाय दुसरे काहीच काम नाही किंवा बदल्यांचे दुकान उघडले आहे असे नेहमीचेच ठेवणीतले टीकास्र सोडले आहे. चंद्रकांतदादा पाटील वगैरे नेत्यांनी त्याहीपुढे जाऊन टीकेच्या डफावर थाप मारत सांगितले आहे की, थांबा, आता बदल्यांमागचा हिशेबच जाहीर करतो.हिशेबाची वही आधीच्या सरकारने ठेवली असावी असे एकंदरीत पाटलांच्या विधानावरून दिसते. बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांचा गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करून चांगलेच केले हे मानायला जागा आहे. यापैकी बहुतेक अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात नेमलेले होते व सरकारने शपथ घेताच या अधिकार्यांना तत्काळ बदलावे अशी जोरात मागणी असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात-आठ महिने कोणत्याही प्रमुख अधिकार्यास हात लावला नाही. कोविड काळात याच अधिकार्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला.
यात पुढे म्हटले आहे की, प्रशासन हे लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे ते नसते. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवला हे महत्त्वाचे. पहिल्या महिनाभरातच त्यांना बदल्या करता आल्या असत्या, पण त्या केल्या नाहीत. ज्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी केला तर इतक्या पारदर्शक बदल्या व नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत याची खात्री त्यांना पटेल. गृहखात्याचा कारभार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱयांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते.
यात शेवटी म्हटले आहे की, कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले हे महत्त्वाचे. बाकी विरोधक काय बोलतात व टीका करतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकारचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो, त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असे सांगता यावे अशा प्रकारे पोलीस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत.