नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस प्रकल्पातील ४४ ट्रेन्सचे चीनी कंपनीला दिलेले अजून एक कंत्राट रद्द करून जोरदार दणका दिला आहे.
केंद्र सरकारकडून वंदे भारत ट्रेनचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. रेल्वेकडून पुढील एका आठवड्यात नव्याने कंत्राट काढण्यात येणार आहे.
४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी असणार्या स्पर्धकांमध्ये चिनी कंपनी भागीदार असणारी सीआरआरची ही एकमेव परदेशी कंपनी होती. यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय चीनसाठी मोठा झटका आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, ४४ सेमी हाय स्पीड ट्रेनच्या (वंदे भारत) निर्मितीचं कत्राट रद्द करण्यात आलं आहे. एका आठवड्यात ऑर्डर काढून नव्यानं कंत्राट मागवले जातील. यामध्ये मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भारतीय कंपनीला हे कंत्राट मिळावं यासाठी रेल्वे प्रयत्नशील असून चिनी भागीदार असणारी कंपनी स्पर्धेत पुढे असल्याचं लक्षात आल्यानंतर कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय रेल्वेच्या चेन्नईतील इंटेग्रल कोच फॅक्टरीकडून १० जुलै रोजी निविदा पाठवण्यात आली होती. याव्यतिरिक्त कंत्राटासाठी निविदा भरणार्यांमध्ये, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, भारत इंडस्ट्रीज, इलेक्ट्रोव्हेव्स इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, मेधा सर्वो ड्राइव्ह्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पॉवर्नेटिक्स इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता.