मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीची झूम अॅपद्वारे होणारी सभा स्थगित करण्यात आली असून ही सभा आता ऑफलाईन या प्रकारात होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नगराध्यक्षा नजमा तडवी यांनी २० ऑगस्ट रोजी झुम अॅपद्वारे ऑनलाईन सभेचे आयोजन केले होते. यात ३६ विषयांवर चर्चा होणार असल्याचे जाहीर देखील करण्यात आले होते. परंतु सत्ताधारी नगरसेवकांनी ही सभा ऑफलाईन घ्यावी, असे मुख्याधिकारी यांना सांगीतले. या कारणावरुन ही सभा आता ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध विकास कामांसाठी साडे चार कोटीचा निधी मंजुर केला होता.हे विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर नगरपंचायतीने न घेतल्याने नगरपंचायतीमधील शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे , उपगटनेते संतोष मराठे व नगरसेविका सविता भलभले यांनी साडेचार कोटीची विकास कामे अजेंड्यावर विषय घेतले नसल्याने या ऑनलाईन सभेवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले होते. यानंतर थेट सभा तहकूब करण्याची वेळ आल्याने सत्ताधार्यांची नामुष्की झाली आहे.
एका वर्षात तीनदा सभा तहकूब करण्यात आली असून आता तर सत्ताधार्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे.