जळगाव प्रतिनिधी । दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नंदुरबार जिल्हयाच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावी विद्यापीठ संचलित (कंडक्टेड) वरिष्ठ विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून मोलगी येथे विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी पुढाकार घेऊन हे महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काही महिन्यांपुर्वी समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य एल.पी. देशमुख, प्रा. मोहन पावरा तसेच प्राचार्य लता मोरे, दिनेश खरात यांचा समावेश होता.
या समितीने ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागात ज्या ठिकाणी विद्यार्थी उच्च शिक्षणात येण्यासाठी आतुर आहेत मात्र संधी नाही अशा परिसराचा शोध घेतला. त्यासाठी पाच ते सहा वेळा समितीने सर्व्हेक्षण केले. त्यानंतर बहुतांश आदिवासी लोकसंख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावी विद्यापीठ संचलित (कंडक्टेड) महाविद्यालय सुरु करता येईल असा अहवाल व्यवस्थापन परिषदेला सादर केला होता. या अहवालाला व्यवस्थापन परिषदेने संमती दिली. या कंडक्टेड महाविद्यालयासाठी अर्थ संकल्पात आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मोलगी येथील हे वरिष्ठ महाविद्यालय सुरु होत असून विज्ञान व वाणिज्याच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सद्या ग्रामपंचायतीचे सभागृह व खासगी जागा घेवून हे महाविद्यालय सुरु होणार असून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विद्यापीठाने जागा मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या परिसरातील प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नितीन वळवी (९४०४८१७१००) यांच्याशी सकाळी १० ते सायं ४ वाजेपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.