फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांची खेलरत्नसाठी शिफारस

नवी दिल्ली, वृत्तसेवा । भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांची यंदाच्या मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

रोहित आणि विनेश फोगाट यांच्याव्यतिरीक्त महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आलेली आहे. रोहित शर्माची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरु शकतो.

याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे. मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत या रोहित, विनेश फोगाटसह अन्य दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

२०१९ विश्वचषकात रोहित शर्माने ५ शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता बीसीसीआयने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं. भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.

Protected Content