मुंबई (वृत्तसंस्था) पवार साहेबांनी सांगितले त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचे झाले तर ‘नया है वह’, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवार यांनी फटकारले होते. पार्थ पवार यांचे वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, असे शरद पवार म्हणाले होते. यानंतर पवार कुटुंबियांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली होती. याविषयी आज छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, पवार साहेबांनी सांगितले त्यावर पुन्हा मी काही बोलण्याची गरज नाही. हिंदीत सांगायचे झाले तर ‘नया है वह’. तसेच अजित पवार नाराज नसल्याचेही भुजबळ म्हणाले. पवार कुटुंबात सगळे आलबेल आहे. पवार कुटुंबात वाद नसल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, पवार कुटुंब सगळे एकत्रित आहे. अजितदादा पण दुखावलेले नाहीत. कोणी दुखावलेले नाहीत, सगळे एकत्रित आहोत,असेही भुजबळ म्हणाले.