नवी दिल्ली (प्रतिनिधी) पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला करताना एफ १६ विमानांचा वापर केल्याचे पुरावे भारताने अमेरिकेला दिले आहेत. दरम्यान, पाकिस्तानला F-16 ही अद्ययावत लढाऊ विमाने देण्यामागे केवळ दहशतवादच नाही तर भारताविरोधात पाकची ताकद वाढविण्याचा सुप्त हेतू असल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणाची चौकशी करून अमेरिका पाकिस्तानवर कारवाई करेल, अशी भारताला खात्री असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. अमेरिका-पाकिस्तान करारानुसार या विमानांचा वापर फक्त दहशतवाद्यांविरुद्ध करणे बंधनकारक आहे. दुसरीकडे भविष्यात भारतासोबत लढाई झाल्यास पाकची ताकद वाढावी, असे अमेरिकेने ही विमाने देताना म्हटले होते. पाकिस्तानमधील अमेरिकेचे तत्कालीन राजदूत अॅने पॅटरसन यांनी पाकिस्तानला ही विमाने व युद्धसामुग्री का द्यावीत, यावर बाजू मांडताना हे मत मांडले होते. त्यावेळी पाकिस्तानला देण्यात आलेल्या युद्धसामुग्रीमध्ये 500 AIM-120-C5 हे अॅडव्हान्स मध्य रेंज असलेले हवेतून हवेत मारा करू शकणारे अमराम हे मिसाईलही देण्यात आले होते. याच मिसाईलचे काही भाग भारतीय सैन्याला सापडले आहेत.