पहूर, ता.जामनेर (वार्ताहर)। पहूर पेठ ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्रमांक १ मध्ये संतोषीमातानगर, शिवनगरात ग्रामपंचायतीचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत . रस्ता आणि गटारीच्या कामाबद्दल ग्रामविकास अधिकारी डी.पी. टेमकर यांना रहिवाशांनी लेखी निवेदन दिले.
एकीकडे पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत, असे असले तरी दुसरीकडे मात्र वॉर्ड क्रमांक १ मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. संतोषी माता नगर मध्ये विविध ठिकाणी डबकी साचली असून रस्त्यांचा तर पत्ताच नाही. डासांचा प्रादुर्भाव होऊन रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच कोरोना विषाणू संक्रमणाचे हॉट हॉटस्पॉट ठरलेल्या पहूरमध्ये या असुविधांमुळे अजूनच धोका वाढण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी पत्रकार संघटनेचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे, प्रवीण कुमावत, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, चेतन रोकडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.
पूर्वीच्या काळी चावडीवर पुढारी आणि गावातील लोक एकत्रित यायचे. तेथे चर्चा व्हायच्या.या चावडी वरून गावातील प्रश्न – समस्यांनाही वाचा फुटायची .बदलत्या काळात या चावड्या इतिहास जमा झाल्या आहेत. आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवीण कुमावत यांनी वार्ड क्रमांक १ मधील समस्या सोडविण्यासाठी व्हाट्सअपग्रुप तयार केला आहे .प्रवीण कुमावत हे ऍडमिन असून या ग्रुपवर स्थानिक रहिवाशी आपल्या समस्या मुक्तपणे मांडत असल्याने व्हाट्सअपग्रुप म्हणजे एक हक्काचे व्यासपीठ बनले आहे. ग्रुपमध्ये सरपंच, उपसरपंच, स्थानिक प्रतिनिधी त्याचबरोबर प्रशासकीय प्रमुख म्हणून ग्रामविकास अधिकारी यांनीही सहभागी व्हावे, अशीही मागणी प्रवीण कुमावत यांनी केली आहे.