जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असल्याने जळगाव शहर महानगरपालिकेची महासभा दि.१२ ऑगस्ट रोजी ऑनलाईन घेण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्याला ऑनलाइन सभेचे प्रशिक्षण देण्यात आले असून रविवारी त्याची अंतिम डेमो महासभा महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
मनपाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात महापौर भारती सोनवणे यांनी ऑनलाईन महासभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी डेमो ऑनलाईन महासभा घेण्यात आली. सभेच्या व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते.
महापौरांनी सर्व व्यवस्था समजून घेतल्यानंतर डेमो महासभा घेण्यास सुरुवात केली. ऑनलाईन डेमो महासभेत अनेक नगरसेवकांनी सहभाग नोंदवित आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. दि.१२ रोजी ऑनलाईन महासभा पार पडणार असून त्यादिवशी कोणताही व्यत्यय येणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.