चोपडा प्रतिनिधी । वाढीव वीजबिलांबाबत महावितरणने ग्राहकांचा अंत पाहू नये, अन्यथा नागरिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी दिला आहे.
महावितरणने ग्राहकांना पाठवलेली वीजबिले कायदेशीरच असल्याचे म्हटले आहे, महावितरणचे असे म्हणणे चुकीचे व वीज ग्राहकांची लूट करणारे आहे. यापुढील काळात महावितरणने वीजग्राहकांचा अंत पाहू नये अन्यथा लॉक डाऊन नंतर वाढिव विजबिलांबाबतचा उद्रेक होणारच असल्याचा इशारा आंदोलनकर्ते जगन्नाथ टि. बाविस्कर यांनी पत्रकान्वये केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, तीन महिन्यांचे एकत्रित वाढीव वीज बिल रद्द करून प्रति महिना त्या युनिटदरानुसार विजबिल दुरुस्त करून मिळावे, यासाठी वीज ग्राहकांकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊन काळातील नियमांचे पालन करून मोर्चे, मेळावे, आंदोलने करण्यात येत आहेत. दि. २९ जुलै च्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव वीजबिलांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही सुतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी जाहीर केले आहे. अशातच महावितरणने कोर्टातील जनहित याचिकेबाबत लेखी उत्तर दाखल करताना ग्राहकांना पाठवलेली वीज बिले कायदेशीर व योग्य असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक ठिकाणी बोटावर मोजण्याइतपत बिले योग्य व कायदेशीर असतील पण बहुतांश बिले ही चुकीची व जास्त आकारणीची असल्याने वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. याआधी वीज बिल रेग्युलर भरले जायचे पण लॉकडाऊन काळातच महावितरणतर्फे मीटर रिडींग न घेता अव्वाच्यासव्वा वाढीव वीजबिले आकारून ग्राहकांची फसवणूक व लूट करण्याचे काम सुरू केले आहे. म्हणूनच वीज ग्राहक रस्त्यांवर उतरून विरोध करीत आहेत.
याबाबत मंत्री मंडळातर्फे योग्य तो निर्णय होऊन वीजग्राहकांना न्याय मिळवुन द्यावा, अन्यथा लॉकडाऊन नंतर आमरण उपोषणाचा इशारा आधीच दिलेला आहे. यासाठी चोपडा तालुका वीज ग्राहकांतर्फे आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर, मधुसूदन बाविस्कर, लखिचंद बाविस्कर, मुरलीधर बाविस्कर,सागरकुमार सोळुंके,वैभवराज बाविस्कर,मोतीलाल रायसिंग, श्रीकृष्ण शिरसाठ, गव्हरलाल बाविस्कर, भगवान वैदु, सतीश बाविस्कर,भगवान कोळी,सुरेंद्र सोनवणे,संजय सैंदाणे हे प्रयत्नरत आहेत.