नाशिक (वृत्तसंस्था) प्रभू श्रीराम हे कुणाच्या मालकीचे नाही. श्रीरामाचा सातबारा कोणाच्या खाजगी नावावर नाही, असे म्हणत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. ते नाशिकमध्ये एका रुग्णालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
नाशिकच्या सिडको परिसरात आज एका कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आव्हाड यांनी रामजन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी आव्हाड म्हणाले रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळी असते. गेली ४० वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केले, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकले, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केले. कोरोनमुक्त महाराष्ट्र घडो हीच श्रीराम चरणी प्रार्थना केली आहे. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा आहे. प्रभू श्रीराम हे कुणाच्या मालकीचे नाही. श्रीरामाचा सातबारा कोणाच्या खाजगी नावावर नाही, असे म्हणत आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.