जळगाव प्रतिनिधी । मद्यधुंद अवस्थेत असणार्या एका कंटेनर चालकाने नेरी ते जळगावच्या दरम्यान अनेक वाहनांना उडवून दिल्याची धक्कादायक घटना आज घडली असून त्याला पोलिसांनी गजाआड केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एमएच २३ -एयू ४४३३ या कंटेनरच्या चालकाने नेरी येथे काही वाहनांना उडविले. यामुळे त्याच्या काही जणांनी पाठलाग सुरू केला. यामुळे त्याने भरधाव वेगाने आपले वाहन जळगावकडे नेले. यात रस्त्यामध्ये आलेल्या अनेक वाहनांना त्याने उडविले. तर काहींना कट मारून कंटेनर पुढे दामटले. भरधाव वेगाने हा कंटेनर जळगाव शहरात शिरला. सुदैवाने आज रविवार असल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. तथापि, काँग्रेस भवन समोर एकाला कंटेनरने कट मारल्याने संबंधीत व्यक्ती जखमी झाला असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, रेल्वे स्थानकाजवळ पुढे रस्ता नसल्यामुळे हा कंटेनर तेथे थांबला. यानंतर लोकांनी यातील चालकाची धुलाई केली. तेव्हा तो मद्याच्या धुंदीत असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी चौकशी केली असता संबंधीत चालक हा भाऊसाहेब रावसाहेब खांडवे (वय ३९ रा. कर्हे वडगाव ता. आष्टी जि. बीड ) असल्याची माहिती त्याने दिली. दरम्यान, भरधाव वेगाने धावणार्या कंटेनरमुळे रस्त्यावर बराच वेळ दहशतीचे वातावरण दिसून आले. त्याने उडविलेल्या वाहनांपैकी अनेकांचे नुकसान झाले आहे. तर काही वाहन चालक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात दिले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.