पत्र्यांनी ब्लॉक केलेल्या रस्त्यांजवळ नवीन पार्कींग स्पॉट ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले । शहरातील प्रमुख बाजारपेठेतील महत्वाचे रस्ते पत्रांनी ब्लॉक केल्यानंतर याच्याच बाहेर नागरिक आपली वाहने पार्क करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे आतील बाजूस मोकळा रस्ता तर बाहेर वाहनेच वाहने असे चित्र आज दिसून आले.

जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून महापालिकेने शहरातील प्रमुख रस्ते पत्रे लाऊन बंद केले आहेत. यात नवी पेठेतील बहुतांश भाग आणि सोबतच्या दाणाबाजाराचा समावेश आहे. प्रचंड वर्दळ असलेले चित्रा चौक, जुने स्टँड, टॉवर चौक आदी भागांमधील गर्दी यामुळे नियंत्रणात आलेली आहे. तथापि, दाणाबाजारासह मुख्य बाजारपेठेत काम असणारे नागरिक पत्रा लावलेल्या भागाच्या बाहेरच आपली वाहने लावत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. आधी वाहने लावणार्‍या अनेकांना आपापली वाहने काढण्यासाठी यामुळे अडचणी येतात. पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत करण्याला प्राधान्य दिले असले तरी आता या नवीन पार्कींग स्पॉटमुळे काही प्रमाणात वाहतुकीला पुन्हा डोकेदुखी सुरू झाली आहे.

शहरातील बेशिस्त वाहनचालक प्रशासनाच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचे पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे शनिवारी पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. गोलाणी मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावरील पत्रांचा अडथळा कुणी तरी काढून टाकल्याने सकाळी बराच वेळ येथून वाहतूक सुरू होती. अखेरी पोलिसांनी येथे धाव घेत हा प्रकार बंद केला. तसेच हा रस्ता पुन्हा एकदा पत्रांनी सील करण्यात आला. तर इतर ठिकाणी सुध्दा पोलीस नजर ठेवून आहेत.

खालील व्हिडीओत पहा याबाबतचा व्हिडीओ वृत्तांत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/325999985221276

Protected Content