भुसावळ प्रतिनिधी । शहरात कार्यरत असणार्या पोलिसांना कोरोनाचे ग्रासल्याचे आधीच समोर आले असतांना आता राज्य राखीव दलाच्या जवानांनाही या विषाणूची बाधा झाल्याचे दिसून आले आहे.
गुरूवारी सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये भुसावळ शहरात ४४ रूग्ण आढळून आले आहेत. तर रात्री यात अजून तीन नवीन कोरोना बाधीतांची भर पडली आहे. यात राज्य राखीव दल म्हणजे एसआरपीएफच्या तब्बल २० जवानांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. याआधी बाजारपेठ पोलीस स्थानकातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले होते. यातील दोघांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला होता. तर, उर्वरित कर्मचार्यांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर एसआरपीएफचे २० जवान या विषाणूच्या संसर्गाने ग्रासले गेल्याचे दिसून आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्य राखीव दलाचे जवान भुसावळ शहरात कार्यरत आहेत. कोरोना योध्दा म्हणून काम करत असतांना त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या जवानांवर उपचार सुरू झाले असून ते लवकरच कोरोनामुक्त होतील अशी अपेक्षा आहे.