भुसावळ प्रतिनिधी । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रेल्वे अतिक्रमण करत असून याला आळा घालण्याची मागणी जनआधार आघाडीने केली आहे.
आज झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सभेच्या दरम्यान, जनआधार आघाडीच्या एका निवेदनाच्या माध्यमातून मागणी सादर केली आहे. यात म्हटले आहे की, शहरातून जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करत असतात. या रस्त्याची मालकी प्रत्यक्षात नगरपालिकेकडे आहे. तथापि, यावर रेल्वे अतिक्रमण करत असून हा रस्ता गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. हा रस्ता रेल्वे ताब्यात घेण्याची शक्यता असून यामुळे हजारो नागरिकांना त्रास होणार आहे. यामुळे रेल्वेच्या अतिक्रमणातून याला वाचवून दोन्ही बाजूने संरक्षण भिंत उभारण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावर जनआधार आघाडीचे गटनेते उल्हास पगारे यांची स्वाक्षरी आहे. हे निवेदन नगराध्यक्ष रमण भोळे यांना देण्यात आले. याप्रसंगी आघाडीचे अन्य नगरसेवक उपस्थित होते.