कानपूर वृत्तसंस्था । आठ पोलीस कर्मचार्यांच्या हत्ये प्रकरणी काल अटक करण्यात आलेला विकास दुबे हा कुख्यात गुंड फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना पोलीसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे.
विकास दुबे याला काल उज्जैन येथे अटक करण्यात आली होती. यानंतर आज पहाटे त्याला कानपूर येथे घेऊन जात असतांना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. ही संधी साधून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी पोलिसांनी एन्काऊंटर करून त्याला ठार केले.
उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील डिकरु गावात गुन्हेगारांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गेल्या गुरूवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पोलिसांचे एक पथक विकास दुबे या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेले होते. सुरुवातीला पोलिसांच्या गाड्या अडवण्यासाठी गुंडांनी जेसीबी उभा करुन रस्ता अडवला. यानंतर पोलीस जेव्हा गाड्यांमधून बाहेर आले त्यावेळी जवळपास १५ ते १६ गुंडांनी छतावरून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. या अंदाधुंद गोळीबारात डीएसपी देवेंद्र मिश्रा आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह ८ पोलीस शहीद झाले. विकास दुबेविरोधात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल असून, हे पोलीस पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात डीएसपीसह ८ पोलीस शहीद झाले. गुंडांनी चकमकीनंतर पोलिसांचे शस्त्रेही पळवून नेली होती. या घटनेमुळे देशभरात प्रचंड खळबळ उडाली होती. दुबेला शोधण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी व्यापक मोहीम सुरू केली होती. दरम्यान त्याच्या दोन साथीदारांना ठार देखील मारण्यात आले होते.
दरम्यान, विकास दुबे याने पलायन करून मध्यप्रदेशातील उज्जैन येथे आश्रय घेतला होता. काल सकाळी तो चेहरा लपवून उज्जैन येथील एका मंदिराच्या बाहेर आढळून आला. पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेऊन त्याला अटक केली आहे. त्याने खोटे ओळखपत्र दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तरी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यानंतर त्याला आज पहाटे सहाच्या सुमारास ठार करण्यात आले.